Search Narayankripa

16 October 2010

SIDDHAYOGA ( MAHAYOGA )-1

नमस्कार! आधीच्या भागात आपण काव्यरुपाने सिद्धयोगाचे वर्णन पाहिले. आज आपण सिद्धयोगाचे वर्णन विस्ताराने पाहू.


" ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असो द्यावे समाधान. " 


भावव्याख्या : वरील ओळी आपल्या सर्वांच्या अगदी परिचयाच्या आहेत. आयुष्यात जे काही घडणार आहे, ते तर ईश्वराच्या इच्छेनेच! मग व्यर्थ चिंता करून काय मिळेल! शरीर आणि मन जळत राहील. म्हणून सदा समाधान बाळगावे. 


पण हे कसे शक्य आहे? मनात जर चिंता, काळजी, नकारात्मक विचार येत असतील तर करणार काय? नाही नियंत्रण होत! नकारात्मक विचार ऊर्जा खातात आणि सकारात्मक सुद्धा!

नामस्मरणाने हे सगळं शांत होतं, असं सारे संत स्वानुभवाने सांगतात. सिद्धायोगाने हे सहज सुलभ झाले आहे, कारण इथे केवळ सद्गुरुकृपाच सगळे करते. काही कारणाने शक्तिपात दीक्षा घेण्याची तयारी होत नसल्यास, तशी तयारी अपोआप व्हावी व सर्वांनाच हा सुंदर अनुभव प्राप्त व्हावा, म्हणून अपार करुणामयी सद्गुरुमाउली परम पूज्य श्री नारायणकाका ढेकणे महाराजांनी सिद्धयोग पूर्वाभ्यासाचा अनमोल खजिनाच सर्वांसाठी मुक्त करून दिलेला आहे.

सिद्धयोग साधनेने आणि त्याच्या पूर्वाभ्यासाने मनाचा हा छळ अगदी सहज आणि तत्काळ शांत होऊ शकतो आणि आनंदाचा खजिनाच, सदा प्रवाहित होणारा झराच  प्राप्त होऊ  शकतो. करायचे काय तर अगदी काहीही नाही. आश्चर्य वाटलं ना! अहो ! ही एक मोठी गम्मतच  आहे, अगदी ( fun ) मजाच आहे. आपोआप होणाऱ्या श्वासोच्वासावर मन अगदी सोडून द्यायचे. मनाला म्हण हवा तेवढा गोंधळ घाल. आम्हाला कसलीही भीती नाही. आमचा श्वास चालूय ना ! मग भीती कसली! आपलं म्हणून काही नियंत्रण ठेवायचच नाही.

नामस्मरणानेही हेच होणार. सतत नाम चालू आहे आणि साधना म्हणजे प्राणसाधना नियमित चालू आहे . मनाच्या सर्व वृत्ती अखंडपणे प्राणात / नामात विलीन होत जातात. मग उदय होतो परमशांतीचा आणि परमानंदाचा!

बस! हे शांतपणे, धीराने होऊ देत जावे, विचार निघून जाऊ द्यावे. कधी कधी त्रास वाटतो, नको हे सगळं! काही उपयोग होत नाही, असंही वाटतं. पण धीर सोडू नये, मनाचेच खेळ ते! घाबरायच काय. सद्गुरूंचे, ईश्वराचे (गुरु म्हणजे ईश्वर आणि ईश्वर म्हणजे गुरु !) वचन आहे सर्वांना " सर्वधर्मान  परित्यज्य मामेकं शरणं व्रज| "  " अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद व्रतं मम| " प्राणात- साधना चालू  असताना आणि इतर वेळी नामात सर्व लीन होऊ देणं , म्हणजेच "सर्व धर्मान परित्यज्य". मनाच्या वृत्तींच्या आहारी जाण,  हेच तर मनाचे धर्म, त्यांच्या आहारी जाऊ नये,  त्यांचा परित्याग सहज झाला, मग तो अभय देणारच. 

सगळ्या संतानी हेच सांगितले आहे. सद्गुरुमाउली नारायण काकांनी वारंवार हाच उपदेश दिला आहे . प्राण हाच देव आणि देव हाच प्राण ! हेच वेगळ्या शब्दात म्हणजे  ' ठेविले अनंते ...' या शब्दांत सांगितले आहे . आपोआप  होणाऱ्या क्रियांना साधने /पूर्वभ्यासा दरम्यान पूर्ण स्वातंत्र्य द्यावे. पूर्ण अप्रतिकार! प्राणरूपी, चैतन्यरूपी आईस पूर्ण समर्पण. असा हा अमृताहूनही गोड सोप्पा अभ्यास सगळ्यांनी जरूर करून बघावा, अशी विनंती आहे. या नवरात्रात शक्तिची ही आत्मपूजा सर्वांनी अनुभवावी. सद्गुरुमाउलीने आपल्या सर्वांच्या कल्यानासाठी हे सुन्दर वरदानच दिलेले आहे, त्याचा अनुभव अगदी सगळ्यांनी घ्यावाच.  गुरूदेवांचा महान संकल्पच आहे, " सर्वे पि सिद्धयोग दीक्षिता: भवन्तु | ".

विचार हे कर्मांचे, शुभाशुभ कर्मांचे बीज आहे , त्यात जर ' ठेविले अनंते तैसेची ' राहील तर साधनेशिवाय इतर वेळही कर्मांवर हळूहळू नियंत्रण येईल, आणि ते पण आपोआप होऊ लागतील. मग ' चित्ती समाधान ' आपोआपच राहील.

आधी  आलेल्या प्रश्नांचे हेच उत्तर आहे. सिद्धयोगाच्या पूर्ण माहिती साठी परम पूज्य काकामहाराजांचे ' सिद्धयोग (महायोग )' हे पुस्तक बघावे, हे विनंती.

back to top